Just another WordPress site

यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता-हवामान खात्याच्या अंदाज

र्नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान-निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असून तो ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल दि.२६ मे शुक्रवार रोजी वर्तवला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.डी.शिवानंद पै यांनी जूनचा पावसाचा अंदाज व मोसमी हंगामाच्या दीर्घकालीन सुधारित अंदाजाची माहिती शुक्रवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.सध्या र्नैऋत्य मोसमी वारे अंदमान-निकोबारजवळ आहेत.आता त्यांच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल स्थिती असल्याने मोसमी पाऊस ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे डॉ.पै यांनी सांगितले आहे.
देशभरात पूर्वमोसमी पाऊस चांगला झाला.एकंदर सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक तर मेमध्ये सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तसेच देशभर कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले.देशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची नोंद झाली मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कमी होते.सध्या ‘एल निनो’ या घटकासाठी अनुकूल स्थिती आहे त्यामुळे पावसाळय़ात ‘एल निनो’ हा घटक सक्रिय होऊन ती स्थिती हिवाळय़ापर्यंत राहू शकते तसेच हिंदी  महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) हा घटक पावसाळय़ात सक्रीय होईल.‘एल निनो’मुळे पावसावर परिणाम होत असला तरी ‘इंडियन ओशन डायपोल’ सक्रिय झाल्याने तो परिणाम भरून निघेल यापूर्वी १९९७ मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती असे डॉ.पै यांनी नमूद केले आहे.यादरम्यान मोसमी पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असून मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीइतका पाऊस पडेल तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी राहील तसेच जूनमध्ये देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून जूनमधील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.डी.शिवानंद पै यांनी व्यक्त केला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.