“भाजपा एक अजगर…..आत्तापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकले”-संजय राऊतांची टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
“भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे” असे विधान शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.भाजपासोबत गेलेल्या शिवसेनेतील शिंदे गटातल्याच एका ज्येष्ठ खासदाराकडून अशा प्रकारे तक्रार करण्यात आल्यामुळे विरोधकांनी त्यावरून सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आघाडीवर हल्लाबोल केला आहे.ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना कीर्तीकरांच्या या विधानावरून शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.गजानन कीर्तीकर यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतला (एनडीए) घटक पक्ष आहे.एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत.आम्हाला घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे.भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे. लोकसभेला आम्ही २२ जागांवर दावा करण्याची गरज नाही.२२ जागा शिवसेनेच्या आहेतच असे गजानन कीर्तीकर म्हणाले होते.
या गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी टोला लगावला असून गजानन कीर्तीकर हे आम्ही एकत्र असताना आमचे जवळचे सहकारी होते त्यांनीही अशा प्रकारे सोडून जाणे आमच्यासाठी वेदनादायी होते परंतु आज गजाभाऊ बोलतायत की त्यांच्या गटाबरोबर सापत्न वागणूक केली जात आहे त्यांना अपमानित केले जात आहे मग आम्ही काय वेगळे सांगत होतो? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक करते.महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याच्या भूमिकेतून भाजपा काम करत होती म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो.भाजपा एक अजगर किंवा मगर आहे आत्तापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकले फक्त आम्ही सोडून.आता शिंदे गटाला अनुभव येतोय त्यांना हळूहळू कळेल की उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती असे संजय राऊत म्हणाले.माझ्याकडच्या माहितीनुसार फुटलेल्या गटात अस्वस्थता आहे,नाराजी आहे.फुटलेल्या गटातही दोन गट पडले आहेत. कीर्तीकरांनी सांगितलेली भूमिकाच शिवसेनेची पहिल्यापासून होती त्याच चिडीतून आम्ही भाजपापासून दूर गेलो त्यांनी दिलेले शब्द पाळले नाही सत्तेत असताना आपल्या लोकांना निधी मिळू दिला नाही.शिवसेनेच्या प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला.शिवसेनेला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला नाही अशावेळी महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली तेच गजानन कीर्तीकर सांगतायत की आम्हाला लाथा घालतायत आम्हाला नीट वागणूक देत नाहीत अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटाबरोबरच भाजपावर टीकास्र सोडले आहे.भाजपाने त्यांचा मूळ स्वभाव,मूळ भूमिका सोडलेली नाही ती आजही कायम आहे.कीर्तीकरांसारखा आमचा सहकारी तिथे जाऊनही सुखी नाही म्हणजे काल मी म्हणालो तसे भाजपाने हा कोंबड्यांचा खुराडा पाळलाय आता त्यातली एकेक कोंबडी त्यांनी कापायला सुरुवात केली आहे असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.