दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात मला लोक म्हणतात पक्ष माझा,मी भारतीय जनता पार्टीची आहे.मात्र पक्ष माझा नाहीये !असे वक्तव्य केले होते.यानंतर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली.इतकेच नाही तर पंकजा मुंडे नाराज असून पक्षांतर करतील अशा चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांनंतर आता स्वतः पंकजा मुंडेंनीच यावर भाष्य केले असून त्या एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.पंकजा मुंडे म्हणाल्या की,मला भाषण करताना नेहमीप्रमाणे जे सुचते ते मी बोलते.बदल हा अपरिहार्य असतो.निसर्गात आणि जीवनात बदल होत असतात.गोपीनाथ मुंडे असतानाही हे बदल झाले आणि नसतानाही होत आहेत.मी भाषण समोरच्या माणसांना उत्साह,प्रेरणा देण्यासाठी करते.मला अभिमान आहे आणि गोपीनाथ मुंडेंनाही होता की,माझे भाषण ऐकायला लोक येतात.माझ्या भाषणाला नकारात्मक करण्याचे काही लोक प्रयत्न करत असतील मात्र त्यामुळे मी थांबत नाही,थकत नाही आणि झुकतही नाही असे मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पंकजा मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की,मला लोक म्हणतात पक्ष माझा,मी भारतीय जनता पार्टीची आहे.मात्र पक्ष माझा नाहीये.भारतीय जनता पार्टी खूप मोठा आहे.आम्हाला काही नाही मिळाले तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला.रासप माझ्या भावाचा पक्ष आहे.वडिलांशी भांडण झाले तर मी भावाच्या घरी जाईन असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.