लंम्पि आजारामुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुपालकांना अर्थसहाय्य देण्यात येणार
पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय जाहीर
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणुजन्य लंम्पि चर्म रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी व पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणानुसार शंभर टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत तसेच सदर बाबीची अमलबजावणी करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे मंत्रिमंडळाने निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय परिपत्रक क्र.डीआयएस-२०२२/प्र.क्र.१३२/पदुम-४ नुसार निर्गमित करण्यात आला असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे आता लंम्पि आजारामुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुपालकांना अर्थसहाय्य मिळणार आहे.
यात दुधाळ जनावरे गायव म्हैस मृत पावल्यास तीस हजार रुपये,ओढकाम करणारी जनावरे(बैल)मृत पावल्यास पंचवीस हजार रुपये,लहान वासरे मृत पावल्यास सोळा हजार रुपये अशा प्रकारे निर्धारित करण्यात आलेले आहे.या योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या पशुपालकाकडील पशुधन लम्पि चर्मरोगामुळे मृत झाले आहे अशा पशुपालकांनी याबाबतची तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संबंधित पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक किंवा ग्रामपंचायतीस द्यायची आहे.संबंधित पशुपालक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक,ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरिक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्युमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यायचा आहे.सदर पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लम्पि चर्मरोगामुळे झाला असल्याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.