मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील सत्तांतरानंतर आज दि.२१ रोजी प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेणार आहेत.आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग शिवसेना या मेळाव्यातून फुंकणार आहे. मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंची तोफ कोणावर निशाणा साधणार हे पाहायला मिळणार आहे.संध्याकाळी ७ वाजता उद्धव ठाकरेंची सभा होईल. दसरा मेळाव्या पूर्वी होणाऱ्या या सभेकडे सर्व शिवसैनिकांसोबतच राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
दसरा मेळाव्या वरून आधीच शिवसेना आणि शिंदे गटात चुरस लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होईल असं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलं आहे. मात्र महापालिकेकडून अजूनही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच दुसरीकडे शिंदे गटाने आधीच बीकेसीतील मैदान बुक करून ठेवले आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिंदे गट आणि मनसे शिवसेनेला आणि खास करून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरेंवर टीका करत मुंबई महापालिकेसाठी भाजपचे मिशन १५० जाहीर केलं आहे. शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे. यासोबतच मनसेचं आव्हानही उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून शिवसैनिकांना नेमकं काय संदेश देतात ते या मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.