अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या भगव्या मोर्चानंतर संगमनेर शहराजवळी समनापूर गावात दोन गटात तुफान राडा झाला आहे.भगवा मोर्चावरून परत येणाऱ्या काही तरुणांनी समनापूरमध्ये दगडफेक केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून या दगडफेकीत पाच गाड्यांचे आणि दोन मोटरसायकलचे नुकसान झाले आहे तसेच काही लोक जखमीही झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.संगमनेरमधील भगवा मोर्चावरून परतत असताना ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,डी.वाय.एस.पी.सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले आहे तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेनंतर समनापुरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देतांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे की,संगमनेरमध्ये एक मोर्चा होता तो मोर्चा दुपारी १२ वाजता संपला त्यानंतर लोक आपआपल्या घरी परत जात असताना संगमनेरपासून ५-६ किलोमीटर अंतरावरील समनापूर गावात काही समाजकंटकांनी १-२ गाड्यांच्या काचा फोडल्या त्यात काही लोक जखमी झाले.या प्रकरणातील दोषींचे फोटो आमच्याकडे आले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.आता समनापूरमध्ये शांतता आहे कुणीही अफवा पसरवू नये.या प्रकरणात आमचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नमूद केले आहे.