भोपाल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.या निकालानंतर काँग्रेसआगामी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.अशातच काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे.आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ,मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार येत आहे असा मोठा दावा काँग्रेसने केला आहे.काँग्रेसने म्हटले आहे की,मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत यात मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार येत असल्याचे दिसत आहे.भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे.
भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे.मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत.सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे इतकेच नाही तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे समोर येत आहे असा दावा काँग्रेसने केला आहे.हा सर्व्हे समोर आल्यानंतर मध्यप्रदेश भाजपात खळबळ उडाली आहे तसेच विद्यमान ६० टक्के आमदारांचे तिकीट कापण्यात यावे अशी सुचनाही वरिष्ठांकडून येत आहे असाही दावा काँग्रेसने केला आहे.यात विविध सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागा वाढत असल्याचे आणि काँग्रेस जनतेचा आवाज म्हणून पुढे येत असल्याचे दिसत असून दुसरीकडे भाजपाची स्थिती वाईट होत आहे यावरून हे स्पष्ट होत आहे की यावेळी भाजपा ५० पेक्षा कमी जागांवर निवडून येईल असेही काँग्रेसने नमूद केले आहे.