मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आला आहे.ठाकरे गटातील नेते मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत तर शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत परंतु तरीही राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार केला जात नसल्याने ठाकरे गटाने हल्लाबोल केला असून राज्यात रखडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये’गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’ असाच सुरू आहे डबल इंजिनवाल्या सरकारची ही अधोगती आहे.सरकारची गती व मती हा अभ्यासाचा विषय असून या सरकारची अब्रू रोज चव्हाट्यार पडते आहे तेव्हा कोणत्या गतीच्या गोष्टी करता? मुंबईसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमायला एवढा उशीर केला आता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महापालिकांना महापौर कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर द्या! असे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटले आहे.