ठाकरे शिवसेनेचा आगामी दसरा मेळावा सोनिया गांधी व शरद पवार यांच्या विचारांचा राहील
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची दसरा मेळाव्यावरून टोलेबाजी
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही दसरा मेळाव्यासाठी हे मैदान मिळावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे, काही झालं तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घ्यायचा, असा संकल्प उद्धव ठाकरेंनी केला आहे. या मुद्द्यावरुन दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत.अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव यांना टोला लगावला आहे.’ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, तर आमचा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा असणार आहे,’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे.
तसंच आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. मात्र त्यांचं नातं कोणाशी आहे?असा प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.जळगाव शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावलेल्या मागील बाजूस जुगाराचा अड्डा सुरू असल्याचं उघड झालं आहे.याबाबत बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘कोणत्याही पक्षाचं कार्यालय हे न्याय देवतेचे कार्यालय असतं. त्यामुळे अशा ठिकाणी सट्टा अड्डा चालविणे ही निषेधार्ह बाब आहे.शिंदे गटातील ज्या महिला पदाधिकाऱ्याने सट्ट्याचा अड्डा उधळून लावला आहे, तिचं मी स्वागत करतो,’असं पाटील म्हणाले.दरम्यान,उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तमानपत्रात खड्ड्याबाबत जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.त्यावर विचारले असता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की,पालकमंत्री असताना १२५ कोटी रुपयांचा निधी देऊनही महापालिकेच्या वतीने खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी जळगाव शहरातले खड्डे दाखवत असल्याने हि मोठी शरमेची बाब आहे,’ असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिकेत सत्ता असलेल्या उद्धव ठाकरे समर्थक महापौर जयश्री महाजन यांना टोला लगावला आहे.