Just another WordPress site

केरळच्या बहुतेक भागासह तमिळनाडूमध्येही मोसमी वारे धडकले-हवामान विभागाकडून आनंदाची बातमी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मोसमी वारे अखेर केरळमध्ये दाखल झाले असल्याची आनंदाची बातमी हवामान विभागाने नुकतीच दिली आहे.मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस केरळमध्ये पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने काल दि.७ जून बुधवार रोजी जाहीर केले होते.हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोसमी वारे आज दि.८ जून गुरुवार रोजी केरळमध्ये दाखल झाले आहे तसेच अरबी समुद्र, बंगालाच्या उपसागरातही मोसमी वाऱ्याने आगेकूच केली आहे.केरळच्या बहुतेक भागासह तमिळनाडूमध्येही मोसमी वारे धडकले असून मोसमी वारे केरळमध्ये चार जून रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता परंतु अरबी समुद्रात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नव्हते शिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांची प्रगती संथ गतीने सुरू होती असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.मोसमी वारे केरळ आणि तमिळनाडूत दाखल होत असतानाच मोसमी वाऱ्याच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने ईशान्यत धडक दिली आहे. मिझोराममध्येही आनंद सरींचा शिडकाव सुरू झाला आहे.मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक हवामान असल्यामुळे पुढील ४८ तासांत मोसमी वारे लवकरच पूर्ण तमिळनाडू व्यापून कर्नाटक,पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत पोहचेल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

 

तसेच राज्याच्या किनारपट्टी भागांवरून घोंगावणारे वादळ पुढे सरकत असतानाच विदर्भात मात्र तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढत चालला आहे.विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान ४३ अंशाच्याही पलीकडे गेले आहे.आता केरळमध्ये मान्सूनची घोषणा हवामान खात्याने केल्यानंतर महाराष्ट्रालाही पावसाचे वेध लागले आहेत.कमाल तापमानातच नाही तर किमान तापमानातही वाढ होत आहे त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे.मुंबई आणि पालघर भागांमध्ये समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे या भागांमध्ये आर्द्रतेचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येत आहे.राज्यात उकाडा अधिक असतानाच मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी दिसून येत आहे त्यामुळे या बदलत्या हवामानाच्या धर्तीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.भारतीय हवामान खात्याने केरळमध्ये मान्सूनची घोषणा केली त्यामुळे महाराष्ट्रातही तो लवकरच येईल मात्र उन्हाचा दाह पाहता सर्वांनाच मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.