रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
कर्जबाजारीपणाच्या ओझ्यामुळे एका महाभागाने चक्क तीन मंदीरात चोरी केल्याची बाब रायगड जिल्ह्यात नुकतीच समोर आली आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून देवीदेवतांच्या चांदीच्या मुर्त्या आणि टाक हस्तगत करण्यात आल्या आहेत.
थेरोंडा येथील खंडोबा मंदिरातील देवीदेवतांच्या चांदीच्या मुर्त्या चोरीला गेल्याची घटना १८ मे २०२३ घडली होती या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली होती.गेल्या सहा महिन्यातील मंदीरातील चोरीची ही चौथी घटना होती त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्देश रेवदंडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.रेवदंडा पोलीसांची २ पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे २ पथके या गुन्ह्याचा तपास करत होती.सिसिटीव्ही फुटेज गोळा करणे,संशयितांचे रेखाचित्र तयार करणे,स्थानिक नागरिकांकडून गोपनिय माहिती हस्तगत करणे,रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, आणि सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करणे अशा वेगवेगळ्या पातळीवर एकाच वेळी तपास करण्यात आला.यावेळी कोळी बांधवांची बैठक घेऊन संशयित हालचालीबाबत विचारणा केली तेव्हा महेश नंदकुमार चायनाकवा वय ३८ वर्षे राहणार आगल्याची वाडी, थेरोंडा यांच्याकडे दोन जण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पैसे मागत असल्याची बाब समोर आली.या माहितीच्या आधारे तपास केला असता महेश चायनाकवा याने या दोघांकडून लग्न आणि व्यवसायासाठी १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र त्याची परतफेड करता येत नसल्याची बाब समोर आली त्यामुळे पोलीसांचा त्याच्यावर संशय बळावला त्यांनी महेशच्या हालचालींवर लक्ष ठेवले व तो सतत संशयास्पदरीत्या वावरत असल्याची पोलिसांची खात्री पटली व पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा कर्जबाजारीपणातून महेश यानेच गावातील मंदीरातील चांदीच्या देविदेवतांच्या मुर्ती आणि टाक चोरी केल्याची कबूली दिली आहे.
पोलीसांनी या गुन्ह्यात चोरीला गेलेला सर्व १ लाख ६० हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे.या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक देविदास मुपडे,पोलीस उपनिरीक्षक दीपक म्हाशिलकर,सहाय्यक फौजदार अशोक पाटील,पी.डी.देसाई,पोलीस हवालदार दिनेश पिंपळे,अस्मिता म्हात्रे,सुषमा भोईर,पोलीस नाईक राकेश मेहेतर,पोलीस शिपाई मनोज दुम्हारे यांनी महत्वाची भूमिका बजावली. जिल्ह्यात मंदिरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील मंदिरांना भेटी देऊन तेथिल सुरक्षा व्यवस्था तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.निर्जन ठिकाणी असलेल्या मंदीरांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे सुचीत करण्यात आले आहे.गरज पडल्यास देवस्थानांना खाजगी सशस्त्र सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याची तयारी आहे त्यासाठी आवश्यक सहकार्य पोलीस दलामार्फत केले जाईल असे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आवाहन केले आहे.