श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला कल्याणमध्ये भाजपाकडूनच विरोध;शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद असल्याचे उघड ?
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत.राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या आघाड्यांमध्ये आपापसांत जागावाटप नेमके कसे होणार? यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत.दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.सत्ताधारी भाजपा-शिंदे गटामध्येही असाच काहीसा प्रकार घडताना दिसत असून कल्याणमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांच्याच मुलाच्या उमेदवारीवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट पुढील सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची माहिती ट्वीट करून दिली आहे मात्र आता मुख्यंत्र्यांचेच पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे त्यामुळे या वादावर शिंदे-फडणवीस कशा प्रकारे उपाय शोधणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान कल्याणमध्ये भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपाने घेतली आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणता उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आली आहे.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते,आमदार,पदाधिकारी उपस्थित होते.गुरुवारी सकाळी झालेल्या या बैठकीनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात दोन्ही बाजूंमध्ये खडाजंगीची चर्चा रंगली आहे.एकीकडे कल्याण लोकसभा उमेदवारीवरून वाद सुरू झालेला असताना दुसरीकडे कल्याणमध्ये इतर राजकीय मुद्द्यांवरूनही शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे.भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविणारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचे निलंबन होईपर्यंत शिंदे गटाला सहकार्य करायचे नाही आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकायचा असा ठराव गुरुवारी मंथन बैठकीत करण्यात आला आहे.खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य करायचे नाही अशी जाहीर भूमिका यावेळी घेण्यात आली.राज्याचे गृहमंत्रीपद भाजपकडे असतानाही एका नेत्याच्या दबावामुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत असेल तर सत्ता काय कामाची?असा सवालही उपस्थित करण्यात आला.सत्तेमधील भागीदार म्हणून संयम आणि शांतता किती काळ ठेवायची?त्यापेक्षा अशी सत्ता नकोच अशी आक्रमक भूमिका यावेळी भाजपाचे प्रदेश चिटणीस गुलाबराव करंजुले यांनी मांडली असल्याने यावर आता काय तोडगा काढला जातो हे रंजक ठरणार आहे.