Just another WordPress site

“पाच मंत्र्यांच्या गच्छंतीवरील भाजप दबावाने शिंदे गटात अस्वस्थता”

मात्र या दोन पक्षांत कुठलाही वाद नसल्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
असमाधानकारक कामगिरी आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात कमालीची नाराजी असून त्यांच्या गच्छंतीची सूचना दिल्लीतील श्रेष्ठींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे समजते त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असून लवकरच वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या युती सरकारमध्ये तणावाची स्थिती आहे मात्र या दोन पक्षांत कुठलाही वाद नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.शिवसेनेच्या या मंत्र्यांमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार,रोहयो मंत्री संदिपान भुमरे,आरोग्य मंत्री तानाजी सावंत,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ही भेट मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती असे उभय नेत्यांनी सांगितले.याच भेटीत शहा यांनी या पाच मंत्र्यांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त केली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या पाहणीत या पाचही मंत्र्यांबाबत प्रतिकूल मत नोंदवण्यात आल्यानेच शहा यांनी तशी स्पष्ट कल्पना शिंदेंना दिल्याचे समजते.दरम्यान या पाचही मंत्र्यांची कार्यशैली वादग्रस्त मानली जाते.जमिनीच्या प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले होते.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील त्यांच्या वक्तव्यामुळेही वादळ उठले होते.वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या प्रमुख पदावर नियुक्त्या करताना सत्तार कचरत नाहीत अशी कृषी विभागात चर्चा आहे.ग्रामीण भागात सरकारविषयी चांगली प्रतिमा निर्माण करायची असेल तर कृषी खात्याची कामगिरी प्रभावी असावी लागते सत्तार यात कमी पडले अशी भावना भाजपच्या वर्तुळात आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या एककल्ली कार्यप्रणालीमुळेही त्यांच्या जिल्ह्यात नाराजी आहे.रोहयो,फलोत्पादन अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असतानाही ते अन्य ‘उद्योगांमुळे चर्चेत आहेत.हाफकिन संदर्भातील कथित वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले तानाजी सावंत यांच्याविरुद्ध भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन आराखडय़ातील निधी वाटप करताना अन्य सर्व मतदारसंघावर अन्याय केल्याची लेखी तक्रार केली होती.सार्वजनिक आरोग्यासारखे जनतेशी निगडित असलेल्या त्यांच्या खात्याचा कार्यभार त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात नेमलेल्या सहायकांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.जळगाव जिल्ह्यातील कापूसकोंडी भेदण्यात अयशस्वी ठरलेले पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर मंत्री म्हणून निष्क्रियतेचा आरोप केला जातो त्यांच्याच मतदारसंघातील अनेक गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.धरणगाव,नशिराबाद यासह इतर गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी मिळते. २०२१-२२ पासून अतिवृष्टी व गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई मिळालेली नाही गेल्या हंगामातील ३० ते ४० टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.विदर्भातील संजय राठोड यांना एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.शिंदे गटात प्रवेश घेऊन त्यांनी पुन्हा मंत्रिपद मिळवले.त्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचाराबाबत राज्यातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती त्यावर पुढे काहीही झाले नाही.विक्रेत्यांची ही संघटना आधीपासून भाजपच्या जवळची म्हणून ओळखली जाते.
दरम्यान बंडाच्या वेळी भक्कमपणे पाठीशी उभे राहणाऱ्या मंत्र्यांना आवरायचे कसे असा पेच शिंदेंपुढे आहे.एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारासाठी समर्थक आमदारांकडून वाढणारा दबाव आणि दुसरीकडे शहांनी केलेली सूचना यात शिंदे गटाची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.यासंदर्भातील बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्यावर या मंत्र्यांच्या वर्तुळात कमालीची अस्वस्थता आहे हे सर्व उघड करण्यामागे भाजपचीच खेळी असल्याची भावना या मंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातून रवींद्र चव्हाण या एकमेव भाजप आमदाराला स्थान मिळाले आहे.ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या १८ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा भाजपकडे आहेत.चव्हाण यांच्यासह एरोलीचे आमदार गणेश नाईक आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे रवींद्र चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लावताना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मात्र साताऱ्याचे शंभुराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले यामुळे स्थानिक भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ठाणे जिल्ह्यातून पुन्हा गणेश नाईक आणि किसन कथोरे ही दोन नावे चर्चेत असली तरी शिंदे यांचा कल कोणाच्या बाजूने असेल, याबाबत उत्सुकता आहे.ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे आणि नाईक यांच्यात फारसा समन्वय कधीच दिसून आलेला नाही.नाईक यांचे पहिल्यांदा मंत्रिपद हुकले त्यामागेही हेच कारण असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना दिसते.गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात शिंदे समर्थक आणि भाजपमधील वाढता तणाव लक्षात घेता ठाणे जिल्ह्यातील राजकारणात वरचढ ठरू शकेल असा नाईक यांचा पर्याय भाजपकडून स्वीकारला जाईल का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.