सादिक शेख,पोलीस नायक
धामणगांव बढे (प्रतिनिधी) :-
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या किंवा धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या पोस्ट टाकणे किंवा फारवर्ड केल्यास तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते अशा पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.या प्रकरणात तेढ निर्माण करण्याची कृती आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर गुन्ह्याची नोंद झाल्याने भविष्यात चांगल्या नोकरी अथवा व्यवसायाच्या संधीस त्यांना मुकावे लागेल.तरी कुणीही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या किंवा धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट टाकू नये अन्यथा त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असे धामणगांव बढे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी म्हटले आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या संकल्पनेतून गावागावात जनजागृती अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलतांना पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी सर्व समाजातील युवकांना आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रत वादग्रस्त बाबींचा गैरफायदा घेऊन सोशल मीडियाचे माध्यमांतून निराधार माहिती,खोट्या अफवा पसरवून दोन जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे यामुळे अशांतता निर्माण होत आहे.तसेच समाजकंटकाद्वारे विविध मार्गांचा अवलंब करून तरुणाईच्या डोक्यात इतरांबाबत द्वेष निर्माण करण्यात येत आहे त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा.तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट करू नये तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देतांना संयम बाळगावा.जर धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुद्धिपुरस्सर आणि दुष्ट उद्देशाने तोंडी,लेखी शब्दांनी अगर चिन्हांद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला विविध कलमांच्या खाली तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.या कायद्यान्वये जो कोणी आक्षेपार्ह पोस्ट,धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट तयार करीत असेल किंवा फारवर्ड करीत असेल किंवा द्वेष किंवा तेढ निर्माण करणारे व्हिडिओ,संदेश,विनाकारण व्हायरल करून जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचे आढळेल त्याच्या विरोधात कलम १५३,१५३ (अ), २९५ (अ) भादंवी कायद्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी यावेळी दिली आहे.त्याचबरोबर आपल्या गावात मोहल्यात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका,सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे आलेले मेसेज,व्हिडिओ,ऑडिओ यांची खात्री करा.संशयास्पद किंवा प्रक्षोभक वाटल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी.तसेच विद्यार्थी,तरुण मुलांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशाप्रकारच्या कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत अथवा स्टेटसला ठेवू नयेत.धार्मिक तेढ असलेले पोस्ट,व्हिडिओ किंवा फोटो पुढे फॉरवर्ड करू नका.कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी केले आहे.