मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा वादात सापडला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती.त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या बाजूने निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे.यावर उद्धव ठाकरे गटातले शहर प्रमुख सचिन बासरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आमची परवानगी का नाकारली?याचे कारण स्पष्ट करायला हवं होते.आम्ही याबाबत कायदेशीर लढाई करू, असा इशारा सचिन बासरे यांनी दिला आहे.
मुंबईत शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट व उद्धव ठाकरे गटांत रस्सीखेच सुरू आहे.त्याचबरोबर कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेतर्फे साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवात देखील हीच रस्सीखेच दिसून आली.सदरील नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे तसेच शिंदे गटाचे शहर प्रमुख विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता.कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर ५४ वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे.यंदा मात्र या उत्सवावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील वादाचं सावट होतं.याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटातील विश्वनाथ भोईर यांना किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे.त्यामुळे किल्ले दुर्गाडीवर यंदाचा म्हणजेच ५५ वा नवरात्र उत्सव शिंदे गटातील शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.उद्धव ठाकरे गटातील कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. गेली ५४ वर्षे या ठिकाणी शिवसेनाच नवरात्र उत्सव साजरा करते.यंदा मात्र आम्हाला का परवानगी नाकारण्यात आली? याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.या निर्णयाबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढू,असा इशारा बासरे यांनी दिला आहे.तर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली असून आता दिवस कमी उरलेत. लवकरात लवकर तयारी पूर्ण करत यंदा नवरात्रीचा उत्सव जल्लोषात करणार असल्याचे शिंदे गटातील कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी सांगितले आहे.