“राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात मंगळवारी १३ जून रोजी प्रसिद्ध केली होती.या जाहिरातीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे.शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे भाजपा-शिवसेना युतीत आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या.शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच फोटो होते तर या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांना डावलल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज बुधवार,१४ जून रोजी शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.शिंदे गटाने आज राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीचा “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जाहिरातीने उत्तरार्ध केला आहे.सलग दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याने त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या जाहिरातींवरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.