भाजपने जाहिरातीवरून नाराजी व्यक्त केली असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नव्या जाहिरातीमधून भाजपच्या मंत्र्यांना का वगळले? असा सवाल केला.नव्या जाहिरातीत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नऊ मंत्र्यांची छायाचित्रे आहेत मग त्यात भाजपच्या मंत्र्यांची छायाचित्रे का नाहीत? असा सवाल त्यांनी केला.पहिली जाहिरात आमच्या पक्षाने दिली नव्हती अशी सारवासारव शिंदे गटाने केली मग ही जाहिरात देणारे हितचिंतक कोण असा सवालही पवार यांनी केला.डोंबिवलीमध्ये शिंदे-भाजप वादास कारणीभूत ठरणारा गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कान दुखत असल्याने मुख्यमंत्र्यांबरोबर कोल्हापूर दौरा करणे टाळले होते तोच धागा पकडत इजा कानाला की मनाला झाली असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजेच पूर्ण महाराष्ट्र वाटू लागले आहे मात्र बेडूक कितीही फुगला,तरी हत्ती होऊ शकत नाही अशा शेलक्या शब्दांत भाजप नेते व राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.शिंदे गटाला पुढील काळात सुखकर प्रवास करायचा असेल तर भाजप आणि जनतेचे मन दुखवून चालणार नाही असे बोंडे म्हणाले.शिवसेना-शिंदे गटाकडून प्रसिद्ध केल्या गेलेल्या जाहिरातीवरून राज्यात राजकीय वातावरण तप्त झाले असताना शिंदे गटाचे कल्याणचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी तातडीने दिल्लीत धाव घेतली.श्रीकांत शिंदे मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते.राज्यातील घडामोडींसंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते त्यांची शहांशी भेट झाली की नाही हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही आपण कामानिमित्त दिल्लीला आल्याचे त्यांनी सांगितले आहे.