पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चारनंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकणार आहे.या वादळाचा थेट तडाखा कच्छसह देवभूमी द्वारका,पोरबंदर आणि राजकोट या भागांना बसणार असून किनारपट्टी भागांतील जवळपास ५० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.अरबी समुद्रातून नेऋत्येकडे घोंघावत निघालेल्या या वादळामुळे मुंबई,ठाणे तसेच पालघर या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रातून वेगाने गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे.वादळाने आपला वेग काहीसा कमी करून दिशा बदलली आहे.नेऋत्येकडे सरकत गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री आठच्या दरम्यान ते कच्छ,सौराष्ट्र या भागांना धडकेल अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली आहे.त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी दीडशे किमीवर जाण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.यानिमित्ताने किनारपट्टी तसेच वादळाचा तडाखा बसणाऱ्या भागांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १८ तुकडय़ा आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १२ तुकडय़ांसह रस्ते,वीज,पाणी तसेच अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या अनेक तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
मागील दोन दिवसांपासून मुंबई,नवी मुंबई येथे जोरदार वारे वाहत होते तसेच मंगळवारी नवी मुंबई व ठाणे परिसरात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली होती.बुधवारी देखील नवी मुंबईत सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली मात्र हा पूर्वमोसमी पाऊस असून तसेच बिपरजॉयचा मिश्र परिणाम असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवण्याची शक्यता असल्याने येथे एनडीआरएफच्या १४ तुकडय़ा तैनात आहेत यापैकी पाच तुकडय़ा मुंबईत असतील.प्रत्येक तुकडीत ३५ ते ४० जवान असून त्यांच्याकडे वादळानंतरच्या नुकसानीत बचावकार्य करण्याची सर्व साधने असणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.चक्रीवादळाचा प्रभाव १८ जूनपर्यंत राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.१८ ते २१ जून दरम्यान मोसमी वारे वादळासोबत वेगाने वाटचाल करून संपूर्ण दक्षिण भाग व्यापतील.चक्रीवादळाचा प्रभाव संपताच मोसमी वाऱ्यांचा वेग आणखी वाढेल.चक्रीवादळ ओमानच्या दिशेने गेले असते तर मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला असता मात्र देशाच्या किनारपट्टीकडे सरकल्यामुळे देशाच्या काही भागात चांगला पाऊस होईल असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.