Just another WordPress site

शिंदे गटाच्या जाहिरातींना भाजप कार्यकर्त्यांकडून फलकबाजी करून प्रत्युत्तर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

मुख्य मंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असून ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी यावेत यासाठी जनतेचा पाठिंबा असल्याच्या शिंदे गटाच्या प्रसिध्दीमाध्यमातील जाहिरातींना भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईभर फलकबाजी करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काव्यपंक्तीचा दाखला देत फडणवीस यांचे नेतृत्व कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी मजबूत असल्याचे फलकबाजीतून अधोरेखित करण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे २६.१ टक्के जनतेला वाटते तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे २३.२ टक्के जनतेेला वाचते अशी जाहिरात शिंदे गटाने एका सर्वेक्षणाचा दाखला देवून दोन दिवसांपूर्वी केली त्यावरून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आल्यावर खुलासा करणारी आणखी एक जाहिरात शिंदे गटाकडून प्रकाशित करण्यात आली.भाजप आणि शिंदे गटातील मतभेद चव्हाटावर आल्याने शिंदे गटाने नरमाईची भूमिका घेतली मात्र भाजप कार्यकर्त्यांची नाराजी अद्याप कायम असून वरिष्ठ नेत्यांच्या मूक पाठिंब्याने भाजप कार्यकर्त्यांनी शहरात फलकबाजी करून प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी ‘सबल भुजाओं में रक्षित है,नौका की पतधार,चीर चले सागर की छाती,पार करे मजधार ‘या वाजपेयी यांच्या काव्यपंक्ती उद्धृत करून भाजपच्या कमळ चिन्हात फडणवीस यांचे छायाचित्र असलेले फलक शहरात अनेक ठिकाणी लावले आहेत.हे फलक प्रामुख्याने फडणवीस यांचा सागर बंगला,भाजप प्रदेश कार्यालय,मुंबई भाजपचे वसंतस्मृती कार्यालय,ठाकरे यांचे मातोश्री निवास स्थान,शिवसेना भवन,मंत्रालय व शिंदे गटाचे कार्यालय,विमानतळ,शीव,विलेपार्ले आदी अनेक ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत.त्रिपाठी यांनी वैयक्तिक पातळीवर हे फलक लावण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी वरिष्ठ भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने शिंदे गटाला प्रत्युत्तर देऊन भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजी व संतापाचे प्रदर्शन करण्यात आले आहे.शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाची तुलना करणारी जाहिरात कोणी केली त्यास कोण जबाबदार आहे आणि त्यांच्यावर शिंदे यांनी कोणती कारवाई केली? याची माहिती जनतेपुढे यावी अशी भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी आहे त्यामुळे भाजप व शिंदे गटातील वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य नेते सांगत असले तरी उभयपक्षी खदखद कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.