Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नंदुरबार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तिमाही परीक्षांसह शिक्षकांचीही तिमाही चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा यासाठी सध्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या बांधकामासाठी कोटयवधींचा निधी देण्यात आला आहे यातून अनेक प्रकल्पातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा कायापालट होत असताना दुसरीकडे आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे त्यामुळे आता याबाबत कठोर पावले उचलले जात आहेत.आश्रमशाळेतील मुले पहिलीपासून दहावीपर्यंत आश्रमशाळेतच राहत असताना ते नापास होतातच कसे असा प्रश्न उपस्थित करून या मुलांना कमीतकमी ७५ टक्के गुण मिळायला हवेत असे डॉ.विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे.
विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित आणि नामांकित शाळांमध्ये नववीत जितकी मुले असल्याचे दाखवून अनुदान घेतले जाते प्रत्यक्षात दहावीत तितकी मुले परीक्षेला बसतच नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे नववीतील संख्येप्रमाणे मुले जर दहावीच्या परीक्षेला बसली नाहीत तर तफावतीतील दहा वर्षांच्या अनुदानाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाईल असे डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे. डॉ.गावित यांच्या हस्ते नुकतेच भालेर,वाघाळे आणि लोय येथे मुलांचे वसतिगृह आणि आश्रमशाळेचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी बोलतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.