Just another WordPress site

मनीषा कायंदेविरोधात ठाकरे गट अपात्रतेची याचिका दाखल करणार?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
शिवसेना आमदार अ‍ॅड.मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गट विधानपरिषद उपाध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे अपात्रतेची याचिका सादर करणार आहे याबाबत कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असून दोन-तीन दिवसांत ही याचिका सादर होईल असे ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे.कायंदे यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.विधानसभेतील शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात गेल्यावर विधानपरिषदेतील आमदार विप्लव बजोरिया हेही शिंदे यांच्याबरोबर सार्वजनिक व्यासपीठावर गेले त्यानंतर कायंदे गेल्याने आता विधानपरिषदेतील आणखी आमदार फुटू नये यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती तयार करण्यात येत आहे.याबाबत पक्षप्रमुख ठाकरे यांची आमदार अ‍ॅड.अनिल परब आणि अन्य नेत्यांशी चर्चा सुरू आहे.

 

विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे बहुमत असून उपाध्यक्षपद शिवसेना ठाकरे गटातील नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे.कायंदे यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभेतील आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांच्या धर्तीवर उपाध्यक्षांकडे सुनावणी होईल.सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणीसंदर्भात आदेश दिले असून त्यानुसार कायंदे यांच्याबाबतही कार्यवाही होईल.त्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यासाठी दोन ते चार आठवडे वेळ द्यावा लागेल त्यानंतर सुनावणीत वकिलांकडून बाजू मांडणे व निर्णयासाठी काही कालावधी लागेल.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै रोजी सुरू होत असून तत्पुर्वी कायंदे यांना अपात्र ठरविण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत त्यामुळे संभाव्य फुटीलाही आवर घालता येईल असे ठाकरे गटातील नेत्यांना वाटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.