Just another WordPress site

शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे अन्यथा ठाकरे गटातर्फे आंदोलन

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गाईच्या दुधाला ४० रूपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर खरेदीदर मिळावा तसेच दुधाचे धोरण ठरवावे,शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला आषाढी पूजेला यावे अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना हाके म्हणाले की,करोना महामारी,टाळेबंदी आणि लम्पी रोगाच्या साथीनंतर दूध व्यवसाय उभारी घेत असतांना राज्यातील दूध संघांनी दुधाचे दर अचानक कमी केले. एका बाजूला पशुखाद्य,पशु वैद्यकीय सेवांचे दर दुप्पट होत असतांना आणि प्रतिलिटर दुधाचा भाव वाढण्याऐवजी दूध संघानी कमी का केला याचे उत्तर राज्य शासनाने आणि दूध संघानी देणे आवश्यक आहे.दुधाची मागणी वाढलेली असतांना दुधाचे दर कमी करुन दूधसंघ नफेखोरी करीत आहेत का? हा प्रश्न शेतकरी जनतेला पडला आहे असे हाके यांनी म्हटले आहे.

दुधाला एफआरपी कायदा लागु करण्यात यावा,महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या ‘ नंदिनी ‘ आणि गुजतरातच्या ‘ अमुल ‘ दुधाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नाममुद्रा निर्माण करावी अशी मागणी त्यांनी केली.प्रत्येक जिल्ह्यात उध्दव ठाकरे शिवसेनेच्यावतीने दूध प्रश्नावर आंदोलन केले जाणार आहे परंतु शासन बघ्याचीच भूमिका घेणार असेल तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हाके यांनी दिला आहे.या पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे,धनंजय डिकोळे,संभाजी शिंदे,गणेश वानकर,अमर पाटील यांच्यासह राज्य विस्तारक शरद कोळी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.