चुंचाळे ग्रामसेविका जळगाव मुख्यालयात तडकाफडकी सक्तीच्या रजेवर
सरपंच नौशाद तडवी व त्यांच्या सहकार्यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देवुन मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांना तडकाफडकी जिल्हा परिषद मुख्यालयात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असुन त्यांनी चुंचाळे ग्रामपंचायतीत केलेल्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासना दिल्यानंतर अखेर चुंचाळे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच नौशाद मुबारक तडवी व त्यांच्या सहकार्यांच्या बेमुदत उपोषणाची आज रोजी सांगता झाली.
तालुक्यातील चुंचाळे या गावच्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांच्या एकतर्फी व मनमानी कारभाराला कंटाळुन त्रस्त झालेल्या सरपंच नौशाद मुबारक तडवी व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत उपसरपंच मनोज फकीरा धनगर,सपना दिपक कोळी,सरला सुधाकर कोळी,कुर्बान तडवी, संजय राजपुत,आस्मीन कदीर तडवी,अजय देवीदास पाटील,जरीना मजीत तडवी,बैतुल कलींदर तडवी यांनी ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांच्या तात्काळ बदली करण्यासाठी लोकशाही मार्गाने यावल पंचायत समितीसमोर आपल्या चार महीने वयाच्या बालकासोबत बेमुदत उपोषणास सुरूवात केली होती.आज दि.२२ जून गुरुवार रोजी सायंकाळच्या सुमारास गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांच्याशी गावातील ग्रामस्थ मंडळी यांच्यासह जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे,पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भाजयुवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी,भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणिस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपुत,सरपंच परिषद तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे व चुंचाळे येथील शेतकरी व यावल तालुका खरेदी विक्री संघाचे बाळु नेवे यांनी उपोषणास पाठिंबा देवुन मध्यस्थी केल्याने अखेर ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांना तडकाफडकी जिल्हा परिषदच्या मुख्यालयात सक्तीच्या रजेवर जमा करून त्यांनी केलेल्या कारभाराची चौकशी करण्यात येणार आहे असे लिखित आश्वासन गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांनी दिल्याने सरपंच नौशाद तडवी व त्यांचे सर्व सहकारी ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली आहे.