दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोळीआळीजवळ मॅगझीमो रिक्षा आणि ट्रक यांच्यात दि.२५ जून रविवार रोजी समोरासमोर धडक झाली होती. या घटनेत मॅगझीमो रिक्षा चालकासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ६ प्रवासी जखमी झाले होते.या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदतही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली.अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत तसेच जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दि.२५ रविवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला असून मॅगझीमो रिक्षा एमएच-०८-५२०८ ही दापोलीतून आंजर्लेकडे जात होती. तेव्हा आसूद जोशीआळी येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर मॅगझीमो रिक्षा आदळली यावेळी ट्रक वेगात असल्यामुळे मॅगझीमो रस्त्याच्या डाव्या बाजूला फरपटत काही अंतरावर गेली.सदरील अपघात एवढा भयानक होता की मॅगझीमोचा अक्षरशः चक्काचूर झाला.या गाडीतील पाच जण जागीच तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला आहे.अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघातस्थळावरून पळ काढला असून त्यांचा शोध दापोली पोलीस घेत आहेत.या अपघातात चालक अनिल सारंग वय ४५,रा.हण्र,संदेश कदम (५५),स्वरा संदेश कदम (८),मारियम काझी (६४),फराह काझी (२७,सर्व रा.अडखळ),मीरा महेश बोरकर (वय २२, रा.पाडले),वंदना चोगले (३४, रा.पाजपंढरी),सामीया इरफान शिरगांवकर अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर सपना संदेश कदम (वय ३४, रा.अडखळ),श्रद्धा संदेश कदम (१४,रा.अडखळ),विनायक आशा चोगले (रा.पाजपंढरी),भूमी सावंत (१७),मुग्धा सावंत (१४),ज्योती चोगले (९, रा.पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.