मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या १ जुलै २३ शनिवार रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.एकीकडे ठाकरे गटाचा मोर्चा निघणार असून भाजपाने आता त्यांच्या आक्रोश मोर्चाची घोषणा केली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेल्यांविरोधात कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजपा उद्या १ जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहे अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तुम्ही लुट केली दरोडा टाकलात.तीन लाख कोटींचा हिशोब द्या तो आम्ही मागतोच आहोत.कोविड काळात १२ हजार कोटींचा घोटाळा केला.बॉडी बॅगपासून ऑक्सिजन प्लॅन्ट,जम्बो कोविड सेंटर,पीपीई कीट,औषध,लसी,बेडशीट कव्हर इथपर्यंत आपल्या बगलबच्च्यांना,पीए आणि आजूबाजूच्या लोकांना मालमाल करण्यासाठी उद्धवजी तुम्ही वापर केला.चौकशी तर चालू आहे हिशोब आम्ही तुमच्याकडून मागतोय म्हणून मुंबईचा आक्रोश मोर्चा नरीमन पॉईंट येथील भाजपाच्या कार्यालयापासून मुंबई पोलीस आयुक्तांपर्यंत जाईल.महिला मोर्चा दादरला स्वामी नारायण मंदिराच्या येथून सुरू होऊन पोलीस आयुक्तालयापर्यंत जाईल या प्रकरणात चौकशी आणि अटक आतापर्यंत का केली नाही याचा जाब आम्ही विचारू असे आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.