शिंदे गटाने त्यांचा मेळावा गुवाहटीला घ्यावा तिथं नाही जमलं तर सुरत किंवा गोव्याला ?
शिवसेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी उडविली शिंदे गटाची खिल्ली
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवतीर्थावर गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे.शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे देशाचे लक्ष असायचे.मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा नक्की शिंदे गट घेणार की उद्धव ठाकरे यावरून वाद सुरु आहे.दोन्हीही गटांनी आम्ही दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच घेणार यासाठी दावा केला होता.मात्र कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने दोन्हीही गटांना परवानगी नाकारली आहे.त्यानंतर हा वाद आता कोर्टात गेला आहे.दसरा मेळावा आणि शिवतीर्थ हे समीकरण आहे आणि शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणे ही शिवसेनेची परंपरा असल्याने शिवाजी पार्कवर आमचाच दसरा मेळावा होणार असं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ठामपणे सांगण्यात येत आहे.अशात आता शिवसेनेचे नेते लक्ष्मण हाके त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान देत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असा इशारा दिला आहे.
या आधीही शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी कोर्टात जावं लागलं होते मात्र त्यावेळी निकाल शिवसेनेच्या बाजूनेच लागला होता.यंदाही निकाल शिवसेनेच्याच बाजूने लागून सेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा विश्वास लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे.तर एकनाथ शिंदे गटाने त्यांचा मेळावा गुवाहटीला घ्यावा तिथं नाही जमलं तर सुरत किंवा गोव्याला घ्यावा त्यांचे मुंबईत काही काम नाही अशी खिल्ली देखील लक्ष्मण हाके यांनी उडवली आहे.जरी आम्हाला दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाले नाही तरी जिथे उद्धव ठाकरे उभे राहतील तिथे महाराष्ट्रातून आलेल्या लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा सुरु होईल.मात्र त्यानंतर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्याची जबाबदारी शिवसेनेची नसून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ईडी’ सरकारची असेल असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.