सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्यात कामगारांच्या खोलीत स्वयंपाक करताना गॕस गळती होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे सदरील घटना आज दि.५ जुलै रोजी सकाळी घडली असून तिघेही मृत कामगार बिहारी असून ३५ वर्षे वयोगटातील आहेत.मनोज देहुरी,आनंद बगदी आणि सोहादेव बगदी अशी त्यांची नावे आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये कार्यरत रूपम टेक्स्टाईल या टॉवेल उत्पादनाच्या कारखान्यात पश्चिम बंगाल आणि बिहारातील कामगार काम करीत असून कारखान्याच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत हे कामगार राहतात.नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाक केला जात असताना गॕस सिलिंडरमधून अचानकपणे गॕस गळती झाली आणि आग लागली व बघता बघता संपूर्ण खोलीने पेट घेतला त्यावेळी सातपैकी चार कामगार खोलीतून सुखरूपपणे बाहेर पडून स्वतःचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले परंतु तीन कामगारांना बाहेर पडता आले नाही.तेथेच उत्पादित टॉवेल आणि खोक्यांचा साठा होता त्यामुळे भडकलेल्या आगीने रौद्र रूप घेतले होते व या आगीत तिन्ही कामगार लपेटले गेले आणि त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महापालिका अग्निशमन यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन तासभरात आग आटोक्यात आणली.जळीतग्रस्त खोलीत तिघेही कामगारांचे मृतदेह आढळून आले.कारखाना खालच्या मजल्यात असल्यामुळे तेथे आगीची झळ बसली नाही.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.