नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जुलै २३ शनिवार
राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांची राज्यातील पहिली जाहीर सभा आज दि.८ जुलै शनिवार रोजी दुपारी तीन वाजता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे.अजित पवार गटात सामील झालेले ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असून या विश्वासू शिलेदाराने मंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत अंधारात ठेवल्याची बाब शरद पवार यांनी मिश्किल शैलीत कथन केली होती.बंडखोरीच्या मुद्यावर जनतेच्या दरबारात जाण्याचे जाहीर केल्यानंतर या राज्यव्यापी दौऱ्यास कधीकाळचे निकटवर्तीय भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून सुरुवात होणार आहे.जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि पदाधिकारी अजितदादा गटात सामील झाले आहेत असे असताना पवार यांनी नाशिकची निवड करीत बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे.राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर स्थानिक पातळीवर पक्षाला मोठे भगदाड पडले असून छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार यांना जुळवून घेतले आहे.छगन भुजबळ हे शरद पवार यांचे निकटवर्तीय होते व त्यांनीच प्रथम बंडाचे निशाण फडकावले.याशिवाय विधानसभेचे उपसभापती व दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ,निफाडचे दिलीप बनकर,कळवण-सुरगाण्याचे नितीन पवार,सिन्नरचे माणिक कोकाटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्ष आणि भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने अजित पवार यांच्या गटात निघून गेले असल्याने या स्थितीत नाशिकमधून शरद पवार हे राज्यातील दौऱ्याचा शुभारंभ करीत आहेत.
कधीकाळचे भुजबळांचे समर्थक आणि नंतर कट्टर विरोधक बनलेले ॲड.माणिकराव शिंदे यांनी शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली असून पावसामुळे व्यत्यय नको म्हणून जलरोधक मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.सभेच्या पूर्वसंध्येला व्यासपीठाचे काम अंतिम टप्प्यात आहे असून येवला शहरासह ग्रामीण भागात ध्वनिक्षेपकावरून माहिती दिली गेली आहे.यानिमित्ताने येवला,लासलगाव परिसरातील माजी आमदार,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनाही सभेला निमंत्रित करण्यात आले आहे.भुजबळांच्या कार्यपद्धतीने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून तो शनिवारच्या सभेतील उपस्थितीतून पाहण्यास मिळेल असे त्यांनी सांगितले आहे.सभा यशस्वी करण्यासाठी हेमंत टकले,माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,गजानन शेलार आदी नियोजन करीत आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने गजानन शेलार यांची नाशिक शहर प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.छगन भुजबळ यांच्या विरोधात सभा घेण्यासाठी शरद पवार हे येवल्याला नाशिकहून मोटारीने जाणार आहेत हे लक्षात घेत भुजबळ समर्थकांनी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर येवला-लासलगाव मतदारसंघाच्या हद्दीत भुजबळ यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे फलक जागोजागी लावले आहेत.पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार हे पहिलीच सभा थेट येवल्यात घेतील याची भुजबळांसह स्थानिक फुटीर आमदारांनी कल्पनाही केलेली नव्हती त्यामुळे शरद पवार यांच्या सभेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे केवळ बंडखोरच नव्हे तर भाजपा,शिवसेनेसह सर्वांचे लक्ष लागले आहे.