Just another WordPress site

“पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचे,आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागले आहे” उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यात विविध ठिकाणचे दौरे करीत आहेत.सध्या उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून  दि.९ जुलै रविवार वाशीम येथील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की,राजकारण म्हटले की फोडाफोडी होतेच हे आपल्याला माहीत आहे.छगन भुजबळ आधी आपल्या पक्षात होते मग राष्ट्रवादीत गेले आता तिकडे गेले ही फोडाफोडी होतच असते परंतु पक्ष संपवून टाकायची जी वृत्ती आली आहे ती आपल्याला संपवून टाकायला हवी.राजकारणात विरोधकांनी जाहीर सभेतून आमच्यावर बोलावे आम्ही तुमच्यावर बोलतो मग जनता जे ठरवेल ते मान्य करायचे याला लोकशाही म्हणतात.मात्र आता तुम्ही मत कोणालाही द्या सरकार माझेच येणार असे चालले आहे.पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचे आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागले आहे अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,जर माझा कारभार वाईट असेल तर जनता मला घरी बसवेल परंतु तुम्ही जे काही केले मला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला तुम्ही खुर्चीवरून खाली उतरवले याची मला पर्वा नाही.मला त्या खुर्चीचा कधीच मोह नव्हता.माझ्या माता-भगिनी मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात यापेक्षा दुसरे सुख मला काही नाही.आपल्याकडील ४० आमदार भाजपाकडे गेले आहेत अपक्षांचाही त्यात समावेश आहे.यात १६० की १६५ जणांचे मजबूत सरकार आहे तरी पुन्हा राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? शिवसेना आणि भाजपाला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायचे हे माझे आणि अमित शाहांचे ठरले होते.मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते परंतु मला शिवसेनेचा मुख्यमंत्री तेव्हाही करायचा होता आणि आताही करायचा आहे.पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
Leave A Reply

Your email address will not be published.