न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला व लोकशाहीचा विजय झाला…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
दसरा मेळावा निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची रोखठोक प्रतिक्रिया
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-साडे चार तासांच्या सुनावणीनंतर बॉम्बे हायकोर्टाने अखेर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाचे आभार मानतानाच आपल्या शिवसैनिकांना उत्साहात वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचे आवतानच धाडले आहे.तसेच न्यायालयाच्या निर्देशानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकार व्यवस्थित पार पाडेल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.मुंबई महापालिकेने शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर ठाकरेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.आज शिंदे गट-मुंबई महापालिका आणि ठाकरेंच्या वकिलांनी सुमारे साडे चार तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने शिंदे गट-मुंबई महापालिकेला दणका देत उद्धव ठाकरेंना दिलासा दिला.शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा अंतरिम अर्ज फेटाळत सरवणकर यांना या खटल्यात सहभागी होण्याचा लोकस नाही हा ठाकरे गटाचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला.यावेळी हायकोर्टाने पालिकेला देखील खडे बोल सुनावले.पालिका आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा ठपका ठेवत कोर्टाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनात एकच गर्दी केली होती.महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना भवनासमोर मोठा जल्लोष केला.यावेळी शिवसैनिकांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे तसेच मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवली.शिवसैनिकांच्या जल्लोषानंतर उद्धव ठाकरे यांनीही ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,”कोर्टाने आज शिवतीर्थावर आम्हाला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थकी लागला.शिवसैनिकांनी आता उत्साहात यावे,वाजत गाजत यावे,गुलाल उधळत यावे.पण येतांना तेजस्वी वारसाला गालबोट लागू देऊ नका कारण आपण शिवरायांच्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो आहे.आपल्या मेळाव्याकडे राज्याबरोबर देशाचे आणि जगभरात राहणाऱ्या मराठी माणसांचे लक्ष लागलंय.यात ५६ वर्षांची आपली ओजस्वी परंपरा आहे.कोर्टाने आजचा निर्णय देताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे.सरकार ती जबाबदारी पार पाडेल अशी आपण आशा करुयात.पहिला मेळावा आजोबा प्रबोधनकार आणि वडील बाळासाहेबांनी घेतला व आता ओजस्वी परंपरा आम्ही पुढे नेतोय. गोरेगावच्या नेस्को मैदानावर गट प्रमुखांचा मेळावा घेतला.आपण सभेचं चित्र पाहिले आहे त्यानुसार आता दसरा मेळाव्याचेही बघा असे उद्धव ठाकरे म्हणाले.न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला व लोकशाहीचा विजय झाला.सुप्रीम कोर्टातील निकाल हा फक्त शिवसेनाच नाही तर लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा आहे असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले आहे.