Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ जुलै २३ बुधवार
राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यापासून या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची नेहमीच चर्चा राहिली असून गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार प्रलंबित आहे.एकीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असतानाच अजित पवार गटातील ९ आमदारांनी सरकारमध्ये सामील होताच पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे शिंदे गट व भाजपातील इच्छुक नाराज असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे नव्याने सरकारमध्ये आलेल्या अजित पवार गटाला कोणती खाती द्यावीत यावरही खलबते चालू आहेत.विशेषत: अजित पवारांना अर्थखाते देण्यावरून बरेच तर्क-वितर्क सध्या चालू आहेत.उद्धव ठाकरे सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते मात्र अजित पवार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त निधी देत असून शिवसेनेला संपवण्याचे काम चालू असल्याचा दावा करत एकनाथ शिंदेंनी बंड केले होते व त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये बरोबर नको अशी ठाम भूमिका शिंदे गटाच्या आमदारांनी घेतली होती.आता तेच अजित पवार राष्ट्रवादी पक्ष बरोबर घेऊन सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.
सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते असून राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये अर्थखाते महत्त्वाचे मानले जाते मात्र आता पूर्वीप्रमाणेच अजित पवार यांच्याकडेच पुन्हा अर्थखाते जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.७ जुलै रोजी सरकारने वीजदर सवलतीसंदर्भात काढलेल्या एका जीआरमध्येही वित्तमंत्री म्हणून कुणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता पण देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मात्र उपमुख्यमंत्री असा केला होता त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दरम्यान अजित पवारांना अर्थखाते देण्याला शिंदे गटाचा विरोध असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे.यासंदर्भात सध्या विदर्भात असणारे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली असून अर्थखाते कुणाला देऊ नये वगैरे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाहीत.शिवसेनेच्या सर्व आमदारांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदेंवर आहे.एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या हिताचा असेल याची पूर्ण खात्री आहे त्यामुळे आम्ही कुणाला कोणते खाते द्यावे याची चर्चाही करत नाही असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.