उत्तर महाराष्ट्र,उत्तर मराठवाडा व उर्वरित विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाची शक्यता -हवामान खात्याचा अंदाज
दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच दक्षिण भारतातही तो कायम असल्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.कोकण वगळता उर्वरित राज्यात मान्सून फारसा सक्रिय नव्हता मात्र काल दि.१३ जुलै गुरुवार रोजी राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली.विदर्भातही मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम असून पावसाच्या सरीही पडत आहे सदरहू पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.आज दि.१४ जुलै शुक्रवार रोजी दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज दि.१४ जुलै शुक्रवार रोजी उत्तर महाराष्ट्र,उत्तर मराठवाडा व उर्वरित विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सून राजस्थानच्या जैसलमेर,दिल्ली,लखनऊ,मिर्झापूर,बालुरघाट ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय असून पूर्व मध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर तर दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर,नागपूर,भंडारा,गोंदिया,धुळे,जळगाव,छत्रपती संभाजीनगर,जालना,बुलडाणा,अमरावती,अकोला,वाशीम, वर्धा,यवतमाळ,चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.