मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
विरार फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांपैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले असून यात मात्र एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना काल दि.१६ जुलै रविवार रोजी संध्याकाळी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,विरार पूर्वेला फुलपाडा येथे महापालिकेचे पापडखिंड नावाचे धरण असून काल रविवारी सुट्टी असल्याने वसंत बोराडेचा मुलगा तसेच शेजारील अन्य दोन मुलांसह पापडखिंड धरणावर फिरायला गेले होते.काल दि.१६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ओम बोराडे वय ११ वर्षे आणि त्याचे दोन मित्र अंश वय १२ वर्षे व वंश वय ११ वर्षे हे तिन्ही जण पाण्यात बुडू लागले.यावेळी स्थानिकांच्या मदतीने वंश आणि अंश यांना वाचविण्यात यश आले मात्र ओम बोराडे हा बालक पाण्यात बुडून मरण पावला आहे.याप्रकरणी रात्री ११ वाजता विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पापडखिंड धरणातून विरार शहराला दररोज १ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो व या धरण परिसरात फिरण्यासाठी तसेच पाण्यात पोहण्यासाठी बंदी असून मागील आठवड्यात याच धरणात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.