अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगत शाळकरी मुलांना मार्गदर्शनासाठी आल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला महाड पोलिसांनी जेरबंद केले असून अनिकेत प्रदिप मिस्त्री असे या तोतया पोलीस उपनिरीक्षकाचे नावे आहे.
दि.१४ जुलै रोजी महाड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल नागाव येथे अनिकेत मिस्त्री हा युवक पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात दाखल झाला त्याने मुख्याध्यापकांना आणि शाळा कमिटी प्रतिनिधींना तो रायगड पोलीस दलात वाहतूक शाखेत कर्तव्यावर असल्याचे सांगून मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.या व्यक्तीचे वागणे संशयास्पद वाटल्याने मुख्याध्यापक आणि शाळा कमिटीवरील अनिल बेल यांनी याबाबतची माहिती महाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अवसरकर यांना दिली.सदरील माहिती मिळताच ते पोलीस नाईक मनिष भोईर,अभिषेक कदम,रविंद्र पवार यांच्यासह शाळेत दाखल झाले त्यावेळी अनिकेत मिस्त्री हा पोलिसांच्या वेषात मुलांना मार्गदर्शन करत असल्याचे आढळून आला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम १७०,१७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.