अजित पवार गटाच्या आमदारांनी आज दि.१७ जुलै सोमवार रोजी पुन्हा शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली.आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी आज पुन्हा भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.विद्या चव्हाण म्हणाल्या की,शरद पवारांनी याचा खुलासा केला आहे की त्यांना भाजपासोबत जाता येणार नाही.जयंत पाटलांनीही याबाबत खुलासा केला आहे. आता सगळे संपलेले असतांना पवार साहेबांना पुन्हा पुन्हा भेटायचे म्हणजे पवार साहेबांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा हे बरोबर नाही.त्या पुढे म्हणाल्या की,पवारांना अशाप्रकारे त्रास देणे बरोबर नाही.तुमच्या हृदयात पवार साहेब असते तर तुम्ही असा मार्ग निवडलाच नसता कारण पवार साहेबांच्या नावावर सगळे आमदार निवडून आले आहेत त्यांनी आपल्या हृदयातून पवार साहेबांना काढून टाकले आणि मोदींची प्रतिमा तयार केली आहे.मोदींसोबत पवारांना जाता येत नाही.सर्वधर्म समभाव मानणारे पवार मोदींसोबत जाऊ शकत नाही हे माहीत असताना त्यांना भेटायला जाणे हे बरोबर नाही असेही विद्या चव्हाण म्हणाल्या.
दरम्यान, कालही अजित पवार गटाच्या आमदारांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार सेंटरमध्ये आल्याचं समजताच त्यांची वेळ न घेता त्यांची भेट घेण्यात आली. शरद पवारांचे मार्गदर्शन घेण्याकरता आणि संभाव्य युती करण्याकरता शरद पवारांनी विचार करावा याकरता शरद पवारांची भेट घेतली असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं. त्यानंतर, आज पुन्हा अजित पवार गटाचे नेते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांना तिथे बोलावून घेतलं असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप होतोय का हे पाहावं लागणार आहे.