Just another WordPress site

बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
राज्यातील पुणे,रत्नागिरी,रायगड आणि विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान विभागाने आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.कोकण आणि विदर्भात आठवडाभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.अनुपम कश्यपी म्हणाले की,बंगालच्या उपसागरात ईशान्य दिशेला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे ते उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने सरकत आहे त्याचा परिणाम म्हणून विदर्भात पुढील आठवडाभर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.अरबी समुद्रावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी पावसाला पोषक स्थिती आहे त्यामुळे किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
                                     

दरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विदर्भात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे.गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये ४०,गोंदियात २५, ब्रह्मपुरीत (चंद्रपूर) २०.४,अमरावतीत १०.४ मिमी पाऊस झाला असून काल सोमवारी दिवसभरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. कोकण किनारपट्टीवरही पाऊस सुरू झाला आहे.सोमवारी दिवसभरात कुलाब्यात ५१ मिमी,तर अलिबागमध्ये १४ मिमी पाऊस पडला.मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस झाला.महाबळेश्वरमध्ये दिवसभरात ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मराठवाडय़ात बीडवगळता दिवसभर पावसाने उघडीप दिली होती.बीडमध्ये हलक्या सरी झाल्या आहेत.यादरम्यान पुणे,रत्नागिरी,रायगड,गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा व नागपूर येथे ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ व कोल्हापूर,सिंधुदुर्ग,सातारा,मुंबई शहर,मुंबई उपनगरे,ठाणे,पालघर,वर्धा,यवतमाळ,अमरावती,अकोला,वाशिम, जळगाव,औरंगाबाद,जालना व बुलडाणा येथे ‘यलो अ‍ॅलर्ट’ देण्यात आला असून या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.