गेल्या काही महिन्यांपासून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदामुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.बच्चू कडू यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केल्यामुळे बच्चू कडूंनी समाधान व्यक्त केले होते तसेच या मंत्रालयाचा कारभार बच्चू कडूंनाच मिळेल अशीही चर्चा होती मात्र अजित पवार गटाच्या समावेशामुळे मंत्रीपदांसाठी तिसरा गट वाटेकरी म्हणून आला आणि ही आशाही संपल्यात जमा झाल्याचे बोलले जाऊ लागले या पार्श्वभूमीवर आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी बच्चू कडूंनी मंत्रीपदावरील दावा सोडत असल्याचे जाहीर केले आहे. देशात आज दोन महत्त्वपूर्ण बैठकांची चर्चा आहे.एकीकडे बंगळुरूमध्ये भाजपविरोधी पक्षांची बैठक होत असतांना दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक आहे या बैठकीसाठी आमदार बच्चू कडूही दिल्लीत दाखल झाले आहेत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांनी आपला निर्णय जाहीर केला.वास्तविक पाच दिवसांपूर्वी अर्थात १३ जुलै रोजी बच्चू कडूंनी यासंदर्भात संकेत दिले होते मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असे ते म्हणाले होते त्यानुसार आज त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे बच्चू कडूंनी यावेळी सांगितले असून ४०-५० आमदार आहेत व मंत्रीपद कमी आहेत.आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी प्रचंड चढाओढ चालू असून या सगळ्यात माझी भूमिका एका मित्राची आहे.त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिले ही मोठी बाब आहे त्यांची अडचण दूर झाली पाहिजे म्हणून मी मंत्रीपदाचा दावा सोडला आहे.त्यांनी आग्रह केला.ते म्हणत होते की तुम्ही आम्हाला मंत्रीपदी हवे आहात.मी त्यांना सांगितले की एकंदरीत अडचण आहे माझ्यापेक्षा दुसरे जर कुणी त्या ठिकाणी खूश होत असेल तर हरकत नाही असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान बच्चू कडूंनी १३ जुलै रोजी आपली भूमिका स्पष्ट केली होती की,मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण गेल्या मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे त्यांनी १७ तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर १८ तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असे ते म्हणाले आहेत त्यानुसार मी १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करेन असे बच्चू कडू तेव्हा म्हणाले होते.एकंदरीत सत्ता,पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला असून सगळे काही पदासाठी नसते.काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे.मी त्याची पर्वा करत नाही.आमची भूमिका ठाम आहे.आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी,शहीद परिवारांसाठी काम करणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.