यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
यावल तालुक्याला गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर यावल ते चिंचोली दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या १८ कि.मी.लांबीच्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असून या रस्त्यावरील ह्या मरण यातना कधी संपणार असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.वाहनधारकांच्या जिवनाशी निगडीत या गंभीर प्रश्नाकडे संबंधित प्रशासन मात्र डोळे झाकुन आंधळेपणाचे सोंग करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.एकीकडे स्वच्छ भारत आणि स्वच्छ रस्तेचा नारा लावला जात असुन दुसरीकडे मात्र दररोज असंख्य प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून व मृत्यूला आमंत्रण देऊन प्रवास करावा लागत आहे.दोन ते तिन वर्षात या मार्गावर अनेक अपघात होवुन अनेक निरपराध नागरीकांनी आपला जिव गमवावा लागला आहे.दरम्यान मागील वर्षांपासून या रस्त्याची वाताहत झाली असून प्रवाशांच्या जिवाशी खेळले जात आहे.रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून मोटरसायकल असो की तिनचाकी रिक्षा प्रवाशांना धक्के खातच प्रवास करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः मृत्युला आमंत्रण देणे सारखेच आहे.पावसाळ्यात पावसाच्या पाण्यानें रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले की खड्डे किती मोठे आहेत याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही यामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असल्याच्या वल्गना करण्यात आल्या आहेत परंतु गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावरील साधे खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आलेले नाही हे विशेष !
पावसाळा सुरू झाल्यावर रस्त्याची डागडुजीकरिता शासनाने या महामार्ग दुरुस्तीसाठी ६१ कोटी मंजूर केले आहेत परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पाऊस सुरू होण्याच्या आधी या रस्त्यावर फक्त चार पाच ठिकाणी खडी टाकून दुरूस्तीचा देखावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असल्याची ओरड नागरीक करीत आहे.चारच दिवसांत हे थातुर मातूरपणे बुजलेले खड्डे हे पुनश्च जैसै थे झाले आहेत.भर उन्हाळ्यात या रस्त्याचे तीन तेरा झाल्यावर सुद्धा त्यावेळी ह्या रस्त्याचे काम सुरू केले नाही आणि आता पावसाळा सुरू झाल्यावर ह्या रस्ताचे दुरूस्ती करीता ६१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे हा सर्व पैसा पावसाळ्याच्या पाण्यातच जाणार आहे की काय? याबाबत शंका कुशंका निर्माण केल्या जात आहेत.त्यामुळे आता रस्ताचे चौपदरीकरणाचे काम होईल तेव्हा होईल तोपर्यंत लहान मोठ्या अपघातांना पावसाळ्यात चार महिने सामोरे जावे लागणार आहे.सदरहू हा रस्ता बांधकाम विभागाकडुन रस्ता प्राधिकरणाच्या ताब्यात गेल्याचे समजत असल्याने संबधित विभाग मात्र प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे त्यामुळे जनमानसात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.