“सन २४ ला पापग्रहांना पूर्ण छेद देऊन सत्तेचा कारक रवी एका काटेरी सिंहासनावर विराजमान होईल”
उल्हास गुप्ते यांच्या विश्लेषणावर आधारित अजित पवार यांची कुंडली
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ जुलै २३ शनिवार
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे.अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात मोठी बंडखोरी करून अजित पवार आठ आमदारांसह बाहेर पडले आणि भाजप- शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेत सामील झाले.योगायोग असा की, महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज एकाच दिवशी आहे.यानिमित्त आज आपण प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांच्या विश्लेषणाच्या आधारित अजित पवार यांची कुंडली काय सांगते व येणारे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल हे पाहूया.
अजित पवारांना सध्या साडेसाती सुरू असून चंद्रा वरुन होणारे शनी भ्रमण मंगळ व प्लुटोच्या प्रतीयोगातून होत असल्याने त्यांना वाढत्या अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत आहे.सत्तेचा कारक रवी हा मूळ कुंडलीत राहूच्या केंद्रात असल्याने एक संभ्रमाचे वातावरण सातत्याने तयार होत असते.घेतलेल्या निर्णयात भावनिकता अधिक दिसून येते.मकर राशीत असलेल्या प्लुटोमुळे सत्तेचा कारक रवी पूर्ण बाधीत झाला आहे.मेष राशीत असलेला हर्षल हा अजित पवारांच्या मूळ कुंडलीतील गुरु-बुध यांच्या अशुभयोगातून जात असल्याने जे ठरवले आहे त्याप्रमाणे घडून येत नाही तथापि पक्षातील वाढती खदखद त्यांना थोपवू शकत नसल्याचेही दिसून येत आहे.दरम्यान या वर्षाच्या म्हणजे २०२३ च्या शेवटापासून ग्रह त्यांना अनुकूलतेचे दान टाकण्यास सुरुवात करतील.दि.२४ एप्रिल २०२४ ला मात्र पापग्रहांना पूर्ण छेद देऊन सत्तेचा कारक रवी एका काटेरी सिंहासनावर विराजमान होईल.दुसरीकडे येत्या २०२४ च्या निवडणुकांसाठी अजित पवार गट हा भाजप शिवसेना युतीचाच भाग राहणार असल्याचे सध्या तरी समजत आहे.अजित पवारांना नुकत्याच झालेल्या खातेवाटपात शुद्ध अर्थ खाते आणि पवार गटातील अन्य मंत्र्यांना सुद्धा महत्त्वाची खाती देण्यात आली आहे तरीही काही आमदारांकडून येत्या काळात पवारांना मुख्यमंत्री पदसुद्धा मिळू शकते अशा आशयाने शुभेच्छा व पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पवारांना एकहाती सत्ता मिळवता येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.