शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख व अन्य दोन साथीदारांची शेअर बाजारात गुंतवणुकीवर वर्षात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ५५ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून शिवसेना माजी महिला आघाडी प्रमुख सुनिता मोरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सांगलीमध्ये सह्याद्री ट्रेडर्स अॅण्ड डेव्हलपर्स या नावाची कंपनी काढून एक वर्षात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचे श्रीमती सुनीता मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.सदरील कंपनीच्या संचालक सुजाता इंगळे,मनोज पाटील रा.आष्टा आणि सचिन यादव रा.चोपडी,ता.सांगोला या तिघाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान श्रीमती सुनीता मोरे यांनी ३३ लाखाची गुंतवणूक केली होती व या गुंतवणूकीच्या परताव्यापोटी २९ लाखांचे धनादेश देण्यात आले होते तसेच नोटरीही करून देण्यात आली आहे मात्र पाच लाख ९७ हजार रूपयांचा परतावा देण्यात आला आणि त्यानंतर पैसे व अथवा परतावा देण्यात आलेला नाही.त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक बजरंग पाटील यांनी १४ लाख तर महेश मासाळ यांनी १४ लाख ६० हजार रूपयांची गुंतवणूक या कंपनीमध्ये केली होती मात्र परतावा अथवा मूळ मुद्दल अद्यापि मिळालेली नसल्याने एकूण ७१ लाख २० हजाराच्या गुंतवणुकीपोटी १५ लाख ५७ हजार रूपयांचा परतावा मिळाला असून उर्वरित ५५ लाख ६३ हजार रूपये दिलेले नसल्यामुळे आमची ५५ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे श्रीमती सुनीता मोरे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.