अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २३ मंगळवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव खुर्द येथील शेतकरी प्रकाश उत्तमराव चिकटे यांनी काल दि.२४ जुलै सोमवार रोजी संध्याकाळी ५ वाजता आपल्या शेताच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.त्यांच्या निधनाबद्दल परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे.
पाऊस उशिरा आल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून तालुक्यात रिमझिम पाऊस आहे.त्यातच वण्यप्राण्यांचा हैदोस मोठ्याप्रमाणात सुरु आहे असे अनेक संकट शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे आत्मघातकी पाऊल उचलत आहे.दुसरीकडे शासन अतिवृष्टीचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक बोजा पडला आहे. आपल्याकडील संपुर्ण पैसे शेतकऱ्यांनी आपल्या शेताला लावून दिले परंतु आता शेतकरी अपुऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. असेच हवालदिल झालेले गावंडगाव शेतकरी प्रकाश चिकटे वय ६० वर्षे यांनी आपले जीवन संपविले.त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले,दोन मुली व पत्नी असे कुटुंब असून त्यांच्या अंगावर बँकेचे कर्ज असल्याची माहिती आहे.या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर रहिमापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली.