Just another WordPress site

“प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून एसटीच्या बसेसचा वापर”-रोहित पवार यांचा आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जुलै २३ शुक्रवार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एका बसचा छप्पर उडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी बसेसच्या दुरावस्थेचा विषय थेट विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला असून यात “प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून एसटीच्या बसेसचा वापर केला जात आहे” असा आरोप रोहित पवारांनी केला आहे त्यानंतर एसटी महामंडळाने स्पष्टीकरण देत कारवाईची माहिती दिली आहे.एसटी महामंडळाने म्हटले आहे की,गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र.एमएच ४० वाय ५४९४ ही गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत होती त्यावेळी वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे चलचित्र विविध समाज माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले.या बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधित विभागाचे यंत्र अभियंता शी.रा.बिराजदार विभागीय यंत्र अभियंता,गडचिरोली यांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात आले नाही तसेच वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतूकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाली आहे या कारणामुळे बिराजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती महामंडळाने दिली आहे.यापुढे वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सूचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत असेही एसटी महामंडळाने नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.