यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत शुक्रवार दि.३० रोजी दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याच्या स्वेच्छा सेवा निवृत्ती निमित्ताने शाळेच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आढाळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नवाज तडवी,केंद्र प्रमुख महंमद तडवी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप तायडे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका विजया पाटील यांनी केले.
प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,केंद्र प्रमुख महंमद तडवी,सरपंच नवाज तडवी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप तायडे,उपशिक्षक शेखर तडवी यांनी ग्रेडेड मुख्याध्यापक दिवाकर सरोदे व उपशिक्षिका सुलोचना सरोदे यांनी केलेल्या प्रशासनातील सेवेबाबत विचार मांडले.सदरील कार्यक्रम प्रसंगी विचार मांडतांना उपस्थितांचे व विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.यावेळी केंद्र प्रमुख महंमद तडवी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप तायडे,उपशिक्षक शेखर तडवी व उपशिक्षिका विजया पाटील यांनी दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याच्या सहवासात घालविलेल्या काळाबाबत तसेच त्यांचा मनमिळावू स्वभाव,कामाबाबची कार्यतत्परता, समजूतदारपणा याबाबत सखोल अशी माहिती दिली.
सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक दिवाकर सरोदे यांनी २७ जून १९८६ पासून जिल्हा परिषद शाळा जवखेडे सिम ता.एरंडोल,वाकडी ता.जामनेर,खानापूर ता.रावेर,आडगाव,डोंगरदा,नायगाव,डोंगर कठोरा ता.यावल या ठिकाणी अविरत अशी ३७ वर्षे प्रशासनात सेवा केली.तर उपशिक्षिका सुलोचना सरोदे यांनी ३३ वर्षे विध्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले.सन २०१८ पासून या दाम्पत्याने चार वर्षे डोंगर कठोरा येथे सेवा दिली.त्यांच्या कार्याचा गौरवही या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.यानिमित्ताने दिवाकर सरोदे यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तर उपशिक्षिका विजया पाटील यांच्या सुलोचना सरोदे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.