Just another WordPress site

कृषीकेंद्र परवाना रद्द करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार

चांदुर बाजार तालुक्यातील दिलालपुर येथील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी चांदूरबाजार येथील शिवार कृषी केंद्रात बुरशीनाशक औषधाची मागणी केली असता सदर औषध न देता आपल्या दुकानातील दुसरीच औषध जबरदस्तीने दिली.सदरील औषध फवारणी करताच संत्रा झाडांची पाने सुकुन गळु लागली तर काही काळाने आंबीया बहाराची संत्रा फळे पिवळे होऊन गळती लागली तसेच संत्रा फळे झाडावरच भाजुन पिवळे होऊ लागली यात चार शेतकर्‍यांचे ९०० संत्रा झाडे प्रभावित झाली असून त्यात सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.याला सर्वस्वी शिवार कृषी केंद्राचे संचालक अनिकेत घोरमाडे जबाबदार असून त्यांनी बुरशी नाशक औषध न देता जबरदस्तीने चुकीचे औषध दिल्याचा आरोप शेतकर्‍यांनी विभागीय कृषी संचालक यांना दिलेल्या तक्रारीत केला असून शिवार कृषी केंद्राचा परवाना रद्द करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

केशवराव दाभाडे व माणिकराव दाभाडे यांचे दिलालपुर शिवारातील शेतात ४०० संत्रा झाडे रविंद्र भाकरे यांचे शेतात २०० संत्रा झाडे तर श्रीमती सिंधुताई भाकरे यांचे शेतात ३०० संत्रा झाडे आहेत.या झाडांवर आंबीया बहाराची बाळ फळे असून मृग बहार फुटण्याच्या अवस्थेत आहे.मृग बहाराची फुट व्हावी यासाठी झाडांना नवती फुटावी म्हणून मावा व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून १० जुलै रोजी स्थानिक शिवार कृषी केंद्रातुन औषधाची मागणी केली.यावेळी कृषी संचालक अनिकेत घोरमाडे यांनी बुरशी नाशक औषध न देता वेगळेच चुकीचे बोगस औषध दिले.यात माणिकराव दाभाडे व केशवराव दाभाडे यांचे कडुन ३१०० रुपये तर रविंद्र भाकरे व सिंधुताई भाकरे यांचेकडुन ४१०० रुपये घेऊन पावती दिली सदरील औषधीची संत्रा झाडावर फवारणी केली असता झाडावरील पाने व फळे जळु लागली.संत्रा फळे पिवळे पडुन गळू लागली आहे तसेच पाने कोमेजल्यामुळे झाडे वाळते की काय अशी भीती निर्माण झाल्याने याची माहीती कृषी केंद्र संचालकांना दिली असता माझी तक्रार कृषी विभागाकडे देऊन टाका व तुम्हाला काय करायचे ते करा अशी उध्दट वागणुक हवालदिल झालेल्या दिलारपूर येथील शेतकऱ्यांना देण्यात आली.सदरील चुकीच्या औषधीमुळे दाभाडे व भाकरे यांच्या ९०० संत्रा झाडावरील फळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याला शिवार कृषी केंद्र संचालक जबाबदार आहे परिणामी या कृषी केंद्राचा परवाना कायम स्वरुपी निलंबित करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकर्‍यांनी आमदार बच्चु कडु,जिल्हाधिकारी,कृषी संचालक,जिल्हा कृषी अधिकारी,तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी,पं.स.कृषी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.तसेच सदरील कृषी केंद्राचा परवाना रद्द व आमची नुकसान भरपाई मदत मिळाली नाही तर या शेतामध्ये आम्ही आत्महत्या करू असे वक्तव्य शेतकरी माणिक दाभाडे,रवींद्र भाकरे,सिंधुताई भाकरे,केशवराव दाभाडे या शेतकऱ्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.