“दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाची मान्यता”
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ ऑगस्ट शुक्रवार
दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी त्यांच्या गाझियाबाद येथील शिल्पशाळेत डॉ.आंबेडकर यांच्या २५ फूट उंचीच्या पुतळय़ाची प्रतिकृती तयार केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य,लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्ती यांना सोबत घेऊन गझियाबाद येथील शिल्पशाळेतील आंबेडकरांच्या पुतळय़ाची प्रतिकृती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे ठरले होते त्यानुसार ६ एप्रिल रोजी प्रतिकृतीची पाहणी करून त्यास संमती देण्यात आली.राज्य शासनाने आता गझियाबाद शिल्पशाळेतील २५ फुटी प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिलच्या जागेवरील स्मारकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा बसविण्यास मान्यता दिली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काल दि.१० ऑगस्ट गुरुवार रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे.राज्य शासनाच्या या स्तुत्य निर्णयाबद्दल आंबेडकर प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सदरील निर्णयाचे आंबेडकरप्रेमींकडून कौतुक केले जात आहे.