“देशाचा पाया पुढील १००० वर्षे मजबूत करणाऱ्या शक्तींना ताकद देण्यावर आमचा भर”-पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी स्पष्ट केली भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन झाल्यापासून मोदी सरकारने नोटबंदीपासून कलम ३७० हटवण्यापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले याबाबत आता स्वतः मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात भूमिका व्यक्त केली यावेळी त्यांनी देशात मोठ्या सुधारणा करू शकल्याचे कारण सांगितले आहे.ते आज दि.१५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ला येथे बोलत होते.नरेंद्र मोदी म्हणाले,देशात मोठ्या प्रमाणात काम होत आहे.२०१४ मध्ये जनतेने एक मजबूत सरकार स्थापन केले.२०१४ आणि २०१९ मध्ये जनतेने सरकार स्थापन केले म्हणूनच मोदीला देशात मोठ्या सुधारणा करण्याची हिंमत मिळाली.
मोदीने एका मागून एक सुधारणा केल्या तेव्हा हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या आणि माझे लाखो हात-पाय असणाऱ्या प्रशासनातील लोकांनी ही सुधारणा करण्याची जबाबदारी योग्य प्रकारे निभावली.प्रशासनाने काम करून दाखवले असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.रिफॉर्म,परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचा हा काळ भारताचे भविष्य निर्माण करत आहे.देशाचा पाया पुढील १००० वर्षे मजबूत करणाऱ्या शक्तींना ताकद देण्यावर आमचा भर आहे असेही मोदींनी नमूद केले.मोदी पुढे म्हणाले,जगाला युवाशक्तीची गरज आहे.या युवाशक्तीसाठी आम्ही वेगळे कौशल्य मंत्रालय स्थापन केले ही युवाशक्ती भारताच्या गरजांची पुर्तता तर करेलच आणि जगाच्या गरजा पूर्ण करण्याचीही क्षमता त्यांच्याकडे असेल असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.