यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑगस्ट २३ रविवार
तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन्ही पदे रिक्त असल्याने रूग्णांचे उपचाराअभावी मोठ्या प्रमाणावर हाल होत असुन आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षीत कारभाराने कळस गाठलेला आहे.याबाबत वरिष्ठांकडे वेळोवेळी तोंडी तक्रारी करून ही सदरचा कारभार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशासनाच्या या दुर्लक्षित व अनागोंदी कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब दिसून येत आहे.या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांची कोणती ही आरोग्य तपासणी न करता कर्मचाऱ्याकडून रुग्णांना औषधी वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच निदर्शनास आला आहे.सदरहू एकूणच सदरील आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारामुळे रुग्णांची फरपट सुरू असून अशा या कारभारामुळे एखादया आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णाचा निश्चित जिव गेल्याशिवाय राहणार नाही अशी गंभीर परिस्थिती या केंद्रात निर्माण झालेली आहे तरी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ प्रशासन केव्हा लक्ष देणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तब्बल १२ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून येणाऱ्या काळात या केंद्रातील अजून काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याने त्या जागा देखील रिक्त होणार असल्याने सदर केंद्राचा कारभार आता पुर्णतः कुणाच्या भरोसे राहणार आहे? असा मोठा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे.एकदंरीत या गोंधळलेल्या परिस्थितीमुळे या केंद्रातील कोणताही कर्मचारी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी केंद्रातील अति महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळत आहे त्यात औषध निर्माता पद रिक्त असल्याने चक्क कोणताही कर्मचारी औषध वाटप करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्यामुळे परिसरातील उपकेंद्रातील सीएचओ सदर साकळी प्रा.आ.केंद्रातील दररोज रूग्णांची तपासणी(ओपीडी) करूनआपली जबाबदारी कशीबशी पार पाडीत आहे.दरम्यान साकळीचे समाजसेवक मनु निळे यांनी केंद्रात गेले असता या ठिकाणी वीस ते पंचवीस महिला आपल्या लहान चिमकुल्यासह रुग्ण तपासणी ताटकळत उभे असल्याचे दिसुन आले तसेच येथुन जवळ असलेल्या मनवेल येथील आश्रम शाळेतील शालेय विद्यार्थी सुद्धा आरोग्य तपासणीसाठी आले असल्याचे मिळुन आले.मात्र या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून तपासणीसाठी असलेले सीएचओ अधिकारी सुद्धा हजर नसल्याने सर्वच रुग्णांना दुपारपर्यंत ताटकळत राहावे लागले तसेच केंद्रातील काही कर्मचारी कुठलीही तपासणी न करता चक्क औषधांचे वाटप करीत असतांना दिसून येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने साकळीच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान आरोग्य केंद्राच्या उदासिन कारभाराकडे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे व केंद्राचे सर्वच प्रश्न तात्काळ मार्गी लागण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे अशी मागणी मनु निळे यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.