डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२३ ऑगस्ट २३ बुधवार
तालुक्यातील अडावद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे पूर्वीपासून पश्चिमेस वापराचा रस्ता असून तेथे गेट अस्तित्वात असतांना शाळेच्या मागील बाजूस बसस्टँड कडील पुर्वेस ग्रामपंचायत किंवा शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे अचानक लोखंडी गेट बसवून तेथील रहिवाश्यांचा वापराचा खाजगी बोळ ताब्यात घेण्याच्या इराद्याने आणि अतिक्रमित गेटच्या पुढील जागा ब्रिटिश काळापासून गुरांच्या कोंडवाड्याची जागा असून तिची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतांना तेथे नविन गेट बसवून वाद निर्माण केला आहे.याबाबतीत स्थानिक रहिवाश्यांसह ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संबधित विभागांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अडावद येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा गावाच्या मध्यवस्तीत आहे.दरम्यान शाळेची स्थापना झाल्यापासुन ते आजपर्यत शाळेचे पश्चिमेस गेट हे प्रशस्त रस्त्याला लागून आहे असे असतांनाही जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू मुलांच्या व मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता शाळेच्या मागील बाजूस पुर्वेकडे लोखंडी गेट बसवून रस्ता बनविण्याचा प्रयत्न केला आहे.शाळेच्या मागे रहिवाश्यांचा खाजगी बोळ आहे आणि त्या जागेला लागून सरकारी गुरांच्या कोंडवाड्याची जागा ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे.सध्या या कोंडवाड्यांच्या सरकारी जागेसंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे असे असतांनाही न्यायप्रविष्ट जागेला लागून पुर्वी कधीही रस्ता नसतांना अतिक्रमण करून गेट बसवून वहीवाट रस्ता बनविणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले असून निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
जि.प.उर्दू शाळेची जागा ही जिल्हा परिषदेची सरकारी मालमत्ता असून प्रशासनाने नियमानुसार नगर भूमापन विभागातर्फे शाळेची जागा चतुःसिमेसह मोजणी करून जागेचे कायम स्वरूपी सिमांकन करून घ्यावे जेणेकरून कुठलेही वाद उदभवणार नाहीत ही माफक मागणी सनदशिर मार्गाने ग्रामस्थांनी केली असून न्याय न मिळाल्यास मात्र तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे.