काँग्रेस अध्यक्ष पदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार
स्वाक्षरीच्या चुकांमुळे केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे,शशी थरूर आणि झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.मात्र आता केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे.स्वाक्षरीमध्ये तफावत आढळल्याने त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे.त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार आहे.काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या फॉर्मची आज छाननी करण्यात आली असून यामध्ये त्रिपाठी यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. केएन त्रिपाठी यांचा फॉर्म विहित निकषांमध्ये बसला नाही आणि त्यात स्वाक्षरीच्या चुकाही होत्या अशी माहिती या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी दिली.
दरम्यान, त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाल्यांनतर आता काँग्रेस अध्यक्ष पदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार आहे.८ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे आणि 19 ऑक्टोबरला निकाल घोषित केला जाणार आहे.