औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.घाटी रुग्णालय फक्त शवविच्छेदनासाठीच राहिले असून मानवी जीवनाशी खेळ होत आहे असे निरीक्षण नोंदवून सात ऑक्टोबरपूर्वी वैद्यकीय रिक्त पदे भरणे त्याचबरोबर औषधांचा अनियमित पुरवठा आणि डॉ. भिवापूरकर प्रकरणी विभागीय चौकशीच्या प्रगती अहवालासंबंधी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठाने दिले.घाटी रुग्णालयात सर्व वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य उपलब्ध असल्याची माहिती सुनावणी दरम्यान सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी दिली.त्याअनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी बाजू मांडताना विनंती केली की घाटी रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्याचे सर्वेक्षण व निरीक्षण करण्यासाठी तांत्रिक समिती नेमन्यात यावी.घाटीरुग्णालयात गरीब रुग्णांच्या उपचारांसाठीच्या औषधांचा पुरवठा अनियमित आहे.त्यामुळे औषधांचा सतत तुटवडा असतो. दुसरीकडे घाटी रुग्णालयाच्या बाजुला दर दोन दिवसांनी फूटपाथवर नवीन मेडिकल दुकानाला परवानगी देण्यात येत असल्याचे जलील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्याअनुषंगाने घाटी रुग्णालयात पूर्ण वेळ डॉक्टर,सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील यंत्रसामग्री कार्यान्वित नसल्यामुळे व अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याचे जलील यांनी यापूर्वीच्या सुनावणीत निदर्शनास आणून दिले होते.याशिवाय वर्ग ३ व ४ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरतीची प्रक्रिया तातडीने राबविण्याची विनंती त्यांनी केली होती.